सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची अवस्‍था डबल ढोलकी सारखीच – विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-  सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची आवस्‍था ‘डबल ढोलकी सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्‍तेत राहाता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी केलेल्‍या विधानावर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, राहुल गांधीचे विधान हे दुटप्‍पी आहे. सरकारमध्‍ये राहायचे आणि आम्‍हाला निर्णयाचे आधिकार नाही असे जाहीरपणे सांगायचे मग सरकारमध्‍ये तुम्‍ही थांबलातच कशाला, तात्‍काळ सरकारमधुन बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा.

एकीकडे सत्‍तेत राहायचे, सत्‍तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे आधिकार नाहीत म्‍हणुन जबाबदारी झटकायची असे दोन्‍ही बाजुने बोलायचे असे कसे चालेल? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

राज्‍यात एवढे मोठे संकट उभे आहे, मुंबईची आवस्‍था अतिशय बिकट झाली आहे. देशातील ४० टक्‍के जनता ही एकट्या मुंबईत आहे. या महानगरात निर्माण झालेल्‍या परिस्थितीला सत्‍तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्‍यातील प्रत्‍येक घटक या संकटामुळे अडचणीत आला असतानासुध्‍दा राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या काही व्‍यक्‍तीगत अडचणी असतील त्‍यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत परंतू बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत याचे कोडे राज्‍यातील जनतेला उलगडलेले नाही. राज्‍यात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्‍याचे आपण पाहत आहोत. भावाअभावी शेती मालाची परवड झाली आहे.

खरीप हंगाम समोर आला असताना नियोजन नाही, फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर बैठकांचा फार्स सुरु आहे. पालमंत्रीसुध्‍दा औपचारिकता म्‍हणुन जिल्‍ह्यात येवून फक्‍त आढावा घेतात,ठोस निर्णय होत नसल्‍याने जनतेला या सरकारकडुन कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्‍यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्‍त लोकांची दिशाभूल करणारे असुन या निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच कॉंग्रेसही जबाबदार असल्‍याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

केंद्र सराकारने महाराष्‍ट्राला विविध माध्‍यमांतून २८ हजार कोटी रुपयांची मदत देवू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्‍या या मदतीवर टिका करण्‍यापेक्षा राज्‍यातील जनतेला तुम्‍ही काय दिले याची श्‍वेतपत्रिका काढा अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24