अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख कोविड-१९ लसींचे डोस प्राप्त झाले असून, राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यात आली आहे.
एका कर्मचाऱ्याला दोन, याप्रमाणे १६ लाख आणि दहा टक्के लस वाया जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याला साडेसतरा लाख कोविड लसींची गरज आहे.
त्यामुळे आणखी साडेसात लाख कोरोना लस मिळाव्यात याकरिता केंद्रीय आरोग्यमंर्त्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी बोलताना दिली.
जालना जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभानंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजपासून संपूर्ण देशासह राज्यात २८५ ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात येत आहे.
जालना येथे चार केंद्रावर हे लसीकरण सुरू आहे. जालना केंद्रावर कोरोना काळात कोविड योध्दा म्हणून काम केलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांना लस टोचण्यात आली.
त्यानंतर डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, कक्षसेविका यांना लस टोचण्यात आली. लसीकरणानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला.