महाराष्ट्र

तहसीलदारांना धक्काबुक्की करणारे दोघे गजाआड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- नगर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत घुसून तहसीलदार, तलाठी व कर्मचार्‍यांना धक्काबुक्कीकरून गोंधळ घालणार्‍या सचिन एकनाथ एकाडे

(वय 35 रा. सारसनगर, चिपाडे मळा, नगर), शाम नामदेव कोके (वय 53 रा. एकतानगर, ता. खेड जि. पुणे) या दोघांना अखेर तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

18 जानेवारी 2022 रोजी नगर तहसील कार्यालयात तहसीलदार, तलाठी व महसूल कर्मचारी यांच्या बैठकीत एकाडे व कोके यांनी प्रवेश करून तहसीलदार यांच्यासोबत हुज्जत घालून मोठमोठ्याने ओरडून तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्हाला भ्रष्टाचाराची लागण झाली आहे,

असे म्हणत बैठकीस बसलेले तलाठी, मंडलअधिकारी, कर्मचारी यांना सर्वांना बघून घेतो अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच तहसीलदार यांच्यासोबत अरेरावी करून बैठक खोलीतील खुर्च्या लोटून दिल्या, बैठकीस आलेल्या महिला तलाठी यांचेकडे बोट करून शिवीगाळ केेले.

मोठमोठ्याने आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तहसील कार्यालयात राडा करून आरोपी एकाडे व कोके पसार झाले होते.

तोफखाना पोलिसांनी त्यांच्या घरी वेळोवेळी शोध घेतला; पण ते मिळून येत नव्हते. दरम्यान त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्‍लेषन केले असता त्यांचे मोबाईल बंद होते.

दरम्यानच्या काळात त्यांनी दुसरे सिम कार्ड घेतले. मोबाईल सेलच्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्या नंबरचे तांत्रिक विश्‍लेषन केले असता ते दौंड रोडवरील खंडाळा (ता. नगर) शिवारात हॉटेल अदिती येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ तेथे जात दोघांना ताब्यात घेत अटक केली.

Ahmednagarlive24 Office