Maharashtra news : देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र, त्याच गावाशेजारी मेघालयमधील खासी हिल्स जिल्ह्यातील मौसीनराम या गावाने आता यावर आपला ठसा उमटविला आहे.
चेरापुंजीला त्याने मागे टाकले आहे. गेल्या २४ तासात चेरापुंजी येथे ९७२ मिमी तर मौसीनराम येथे १ हजार ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही दोन्ही ठिकाणे एकमेकांच्या शेजारी आहेत.
या दोन गावात देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण होण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.आयएमडीच्या नोंदीनुसार १७ जून रोजी झालेला पाऊस हा एका दिवसात झालेला दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस ठरला आहे.
याआधी १६ जून १९९५ रोजी चेरापुंजी येथे १ हजार ५६३.३ मिमी पाऊस पडला होता. मौसीनराम येथे ७ जून १९६६ रोजी एका दिवसात ९४५.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
चेरापुंजी आणि मौसीनराम या दोन्ही ठिकाणांमधील अंतर १५ किलोमीटर इतके आहे. १९८५ साली मौसीनराम येथे २६ हजार मिमी पाऊस झाला होता जो आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.