Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, तहानलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक, नगरमधून ८.६०३ टीएमसी पाणी मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या आत सोडण्यात येणार होते.
परंतु नाशिक व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने पाणी सोडण्याच्या निर्णयाला जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडी स्थगिती दिली असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे जलसंपदा व जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याच्या भूमिकेवर पुढील आदेश प्राप्त होइपर्यंत ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार जायकवाडीसाठी यंदा नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणांमधून ३१४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असून, त्याची झळ मुख्यत्वे नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील शेतीला बसणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांमधून ५०० दशलक्ष घनफूट, तर आळंदी, कडवा, भाम, भावली, दारणा, मुकणे आणि वालदेवीतून उर्वरित २६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.
मंगळवारी विसर्ग सुरू करण्यात येणार होते. त्यानुसार पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय तयारी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने केली होती. परंतु पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक व नगरच्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत, जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच नगर जिल्ह्यातील एकाने पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचीही चर्चा होती.
त्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत प्रशासनातच द्विधा मनःस्थिती होती. अशातच रात्री फडणवीस यांनी स्थगितीचे तोंडी आदेश जलसंपदा विभागाला दिल्याचीही चर्चा होती. या सर्व घडामोडींमध्ये अखेर पाणी सोडले गेले नाही.