Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नामदार दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, राजू वाघमारे, आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, हेमंत पाटील, राजश्री हेमंत पाटील, संजीव भोर आदी नेते उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निळवंडेचे कालवे पूर्ण झाले आहे. यातून ज्या भागाला पाणी देणे शक्य झाले नाही. त्या भागाला देखील लवकरच वितरीकांद्वारे पाणी दिले जाणार आहे. शहिद हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे यांच्या सारख्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला गाडले पाहिजे. ज्यांना आता बाळासाहेबांना हिंदूहृदय सम्राट म्हणण्याची लाज वाटते. ते जय श्री राम असे बोलू शकत नाही. त्यांना मते कसे? देणार असाही प्रश्न ना. शिंदे यांनी उपस्थित केला.
त्यामुळे जो राम का नहीं वो काम का नहीं असे म्हणत त्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेर मध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग आला नाही.
त्यांच्या काळात संगमनेरची प्रगती होण्यापेक्षा यांच्या कुटुंबाची प्रगती झाली असल्याचीही टीका विखे पाटील यांनी आ. थोरात यांच्यावर केली. खा. लोखंडे यांनी निळवंडेसाठी काम केले. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केली.
महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेच्या लढाईबरोबर घाटमाथ्याची लढाई लढावी लागणार असल्याचे सांगत भोजापूर पूर चारीचे देखील काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. घाटमाथ्याचे पाणी आणायचे असेल तर केंद्रात व राज्यात एका विचाराचे सरकार लागेल असेही त्यांनी सांगितले.