जादूटोण्याच्या भीतीपोटी युवकाकडून वृद्धाची हत्या ! अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : वारंवार जादूटोणा करून मारण्याची भीती दाखवत असल्याच्या रागातून एका युवकाने साठ वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील डोणी येथे घडली. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमृत बाजीराव अलाम (वय ६०) असे मृतकाचे, तर विजयपाल गोविंदराव अलाम (वय २५) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

मूलपासून १५ किमी अंतरावर आदिवासीबहुल डोणी हे गाव असून हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत येते. मृतक अमृत बाजीराव अलाम आणि आरोपी विजयपाल गोविंदराव अलाम यांचे शेत लागूनच आहे. दोघांचीही शेती लागून असल्याने दोन- तीन वर्षापूर्वी शेतीच्या वादामधून दोघांच्याही कुटुंबात भांडण झाले होते.

या वादामुळे मृतक अमृत अलाम हा आरोपी विजयपाल अलाम याला नेहमी जादूटोणा करून तुला जिवंत मारून टाकतो, अशी धमकी देत असायचा. त्यामुळे आरोपीला भीती निर्माण झाली होती. याच भीतीपोटी आरोपी विजयपाल अलाम याने संधी साधून अमृत अलाम याचा काटा काढला.

घटनेच्या दिवशी शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी अमृत बाजीराव अलाम नेहमीप्रमाणे सकाळी शेतावर जाऊन १० वाजता घरी परत आला. जेवण करून दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लहान भाऊ भीमराव अलाम यांच्या घरी गेला व सायंकाळी ५ वाजता दरम्यान गावातील हनुमान मंदिरजवळ भरणारा बैल पोळा पाहून घरी परत गेला.

सायंकाळी ७ वाजतानंतर चुलतभाऊ मंगरू अलाम याला फोन लावतो, असे सांगून मोबाइल घेऊन समाज मंदिराकडे गेला. ८ वाजून गेले तरी पती अमृत अलाम घरी परत आले नाही, या चिंतेत पत्नी अन्नपूर्णा असताना ८.३० वाजताच्यादरम्यान घराजवळ राहणारे मनोज देवीदास नैताम व विकास मधुकर अलाम यांनी अमृत हा समाज मंदिराजवळ पडून असल्याचे त्यांना सांगितले.

पती पडून असल्याची माहिती मिळताच अन्नपूर्णा ही दीर भीमराव अलाम याला घेऊन समाज मंदिराकडे गेली तेव्हा पती अमृत हा समाज मंदिराच्या पायरीजवळ टेकून पडलेला दिसला. मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात पाहिले असता अमृतच्या चेहऱ्यावर मारल्याच्या जखमा व दुपट्टयाने दोन हात पाठीमागे बांधलेले व त्याच दुपट्ट्याने गळा आवळून बांधल्याचे दिसले.

दुपट्टयाने गळा आवळल्याने जीभ चावलेली आणि तो मृत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी गावातील काही जणांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता विजयपाल गोविंदराव अलाम याने अमृत बाजीराव अलाम याचा जादूटोण्याच्या भीतीपोटी दुपट्ट्याने आवळून खून केल्याचे कबूल केले..