महाराष्ट्र

…तर कुणबी दाखले न्यायालयात रद्द होऊ शकतात !

Published by
Ahmednagarlive24 Office

शासनाने कुणबी दाखले बॅकडोअर एण्ट्रीने देणे बंद करावे; अन्यथा हे दाखले उच्च न्यायालयाकडून रद्द होऊ शकतात, असा इशारा अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी स्वतंत्र आरक्षण द्यावे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. जरांगे-पाटलांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ना. भुजबळांनी, जरांगे-पाटील मलाच नाही, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील आदेश देऊन धमकावू शकतात, अशी टीका केली.

ना. भुजबळ यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जरांगे-पाटील रोज माझ्यावर टीका करतात. मात्र मी बोललो की, भुजबळ वातावरण दूषित करत असल्याचा आरोप केला जातो.

मात्र मलाही काही मर्यादा आहेत. मी काही जाळपोळ करत नाही आणि बेकायदेशीरपणे पिस्तुल आणि गुंडही जवळ ठेवत नाही आणि त्यांना सोडवतही नाही. जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाबाबतच्या अभ्यासावर तर न बोललेलेच बरे, असा टोलाही त्यांनी मारला.

भिडे वाड्यात आदर्श शाळा व्हावी

पुणे येथील भिडे वाड्याच्या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची आदर्श शाळा साकारावी. तसेच या ठिकाणी त्यांचा जीवन प्रवास आणि पुतळा उभारण्यात यावा,

अशी सूचना ना. भुजबळांनी करत जादा एफएसआय तसेच बांधकामांचे नियम शिथिल करीत या सर्व गोष्टी साधणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १० डिसेंबर रोजी पुणे येथे जाऊन विविध बाबींचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office