अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोरोनाने अनेक धार्मिक सण व उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. अगदी वर्षानुवर्षे परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवरही कोरोनाची छाया होती.
आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने १२ सूचना जारी केल्या आहेत.त्या पुढीलप्रमाणे –
१) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असेल.
२) न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असे उत्सवाचे मंडप असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी.
३) शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो तो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
४) गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल व सर्वांनाच सुरक्षित राहता येईल.
५) सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या असतील हे पाहावे.
६) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे.
७) आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे.
८) श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी.
९) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे पाहावे.
१०) गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी.
११) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी
१२) राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews