अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. कोरोना सारख्या महामारीने मनुष्यामध्ये आरोग्याप्रती जागृकता निर्माण झाली. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते.
सलग 40 वर्ष दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद आहे.
निंबळक गावासह एमआयडीसीच्या विकासात लामखडे परिवाराचे भरीव योगदान दिले आहे. टाळेबंदीत देखील लामखडे परिवाराने वंचितांना आधार देऊन माणुसकी जपल्याची भावना आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच कै. संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित 40 व्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार लंके बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य माधवराव लामखडे, माजी सरपंच विलास लामखडे,
नितीन सुर्यवंशी, अशोक ठुबे, उपसरपंच घनश्याम म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य नाना दिवटे, अविनाश आळंदीकर, बाळासाहेब गायकवाड, उद्योजक अजय लामखडे, सोपान कुलट, सुनिल जाजगे, संभाजी सोनवणे, अशोक कोतकर, अशोक कळसे, सिताराम सकट, अतुल मगर, दत्ता रोकडे,
सोहेल शेख, आयुष लामखडे आदींसह खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे आमदार लंके म्हणाले की, निंबळक गटाला माधवराव लामखडे यांच्या रुपाने उत्तम नेतृत्व मिळाले आहे. गावात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहे. प्रलंबीत कामासाठी देखील सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात विलास लामखडे यांनी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ही स्पर्धा सिझन बॉलवर दिवाळीच्या सुट्टयात घेण्यात येते. स्पर्धेचे हे 40 वे वर्ष असून, अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
गावातील युवक मैदानावर येण्यासाठी व निर्व्यसनी पिढी घडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याने गावातील मोठ्या संख्येने युवक सैन्यात व पोलीस मध्ये भरती झाले असल्याचे त्यांनी सांगितले. माधवराव लामखडे यांनी खेळाने मन, शरीर एकाग्र होते.
अपयशाने खचून न जाता जिद्द व संयमाने पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा खेळाने मिळते. खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होत असल्याचे सांगून, निंबळक गटात केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. निंबळकच्या ग्रीन हील स्टेडियम मध्ये होत असलेल्या दिवाळी क्रिकेट स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातील 20 संघाना प्रवेश देण्यात आला आहे.
अंतिम सामना शहर व ग्रामीणच्या विजयी संघात रंगणार आहे. स्पर्धा सिझन बॉलवर असल्याने उत्कृष्ट संघांचे शानदार प्रदर्शन क्रिकेट रसिकांना पहावयास मिळत आहे. मर्यादित क्रिकेट संघाचे सामने साखळी पध्दतीने खेळविण्यात येत असून प्रथम विजेत्या संघास 31 हजार रुपये,
उपविजेत्या संघास 21 हजार रुपये, तृतीय संघास 11 हजार पाचशे रुपये व चतुर्थ संघास 7 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिस दिले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टचे सदस्य परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना दिवटे यांनी केले. आभार बाळू कोतकर यांनी मानले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved