Mumbai News : धक्का लागला, वाद झाला, अन रेल्वेखाली तरुणाचा जीव गेला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : रेल्वे स्थानकातील गर्दीत एका तरुणाचा महिलेला धक्का लागला. त्यांचे भांडण झाले. त्या महिलेच्या नवऱ्याने त्याला जोरदार थप्पड लगावली. तसा तो तरुण फलाटावरून खाली पडला. तो वर चढत असताना आलेल्या रेल्वेने त्याला चिरडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेची चित्रफित सध्या व्हायरल झाली असून, किरकोळ वादातून एक तरुणाला प्राण गमवावे लागल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दादर पोलिसांनी या प्रकरणी अविनाश माने (३१) आणि त्याची पत्नी शीतल (३०) या दोघांना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शीव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर जिन्याने उतरत असताना चुकून दिनेश राठोड (२६) या तरुणाचा शीतल माने हिला धक्का लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

ती त्याला छत्रीने मारू लागली. ते पाहून अविनाश माने याने दिनेशला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. दोघांनीही त्याला बेदम मारहाण सुरू केली. अविनाश याने त्या तरुणाच्या कानाखाली एक जोरदार थप्पड लगावली.

तसा त्याचा तोल गेला आणि तो रुळावर पडला. त्याच रूळावरून लोकल येत होती. ते पाहून तो जीवाच्या आकांताने वर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकलने त्याला चिरडले.

ही घटना सोमवारी घडली. मात्र, तेव्हा पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. नंतर त्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार समजला. त्यावरून त्यांनी त्या पती-पत्नीला अटक केली. मृत्युमुखी पडलेला दिनेश हा बेस्टमध्ये नोकरी करत होता.