महाराष्ट्र

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, राऊतांचा दावा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  गोवा राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिल्याने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

काँग्रेससमोर या दोन्ही पक्षांनी आघाडीचा प्रस्ताव मांडला असून त्याला काँग्रेस कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने या दोन्ही पक्षांनी आघाडी जाहीर केली आहे.

या संदर्भात संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेसला टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी यावेळी गोव्यात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही तिन्ही पक्षांची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न होता.

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आघाडी झाली असून गोव्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले आहे. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलले असून, मी स्वत: काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली.

मात्र काँग्रेसने त्यास प्रतिसाद दिला नाही. कदाचित गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असं काँग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही.

आम्ही आता आमचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहे. तसेच गोव्यात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल.

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल. गोव्याची जनता योग्य तो कौल देईल व गोव्यातही महाराष्ट्रासारखे एक सक्षम सरकार येईल याचा आम्हाला विश्वास वाटतो, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

यावेळो बोलताना राष्ट्रवादी नेते पटेल म्हणाले की, गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीने गोव्यात एकजुटीने लढावे असा आमचा प्रयत्न होता.

त्यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आमच्या प्रस्तावावर काँग्रेसचा होकार अथवा नकारही आला नाही.

त्यामुळेच आम्ही काँग्रेसशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रितपणे निवडणूक लढणार असून, गोव्यातील सर्व 40 जागा आम्ही लढणार नाही,

पण जास्तीत जास्त जागा आम्ही लढू’, असे पटेल यांनी सांगितले आहे. उमेदवारांची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत आणि तीन-चार दिवसांनंतर दुसरी यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे.

Ahmednagarlive24 Office