Navi Mumbai News : कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत अंतरिम अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर अंतरिम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कल्याणमधील १४ गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी येथील गावकऱ्यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री व विद्यमान मुख्यमंत्रीशिंदे यांच्याकडे १४ गावांच्या विकासाचा प्रश्न मांडला होता. तसेच विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आ. प्रमोद पाटील, डॉ. बालाजी प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, आ. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची घोषणा २४ मार्च २०२२ रोजी केली होती. त्यानंतर नगरविकास विभाग मागील वर्षी हरकती, सूचनांकरिता १२ सप्टेंबर २०२२ ला अधिसूचना जाहीर केली होती. त्यावर एकही हरकत न आल्याने या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
विकास कामांसाठी १४० कोटींचा निधी जाहीर
१४ गावे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत अजूनही अंतरिम अधिसूचना न काढल्याने येथील विकास कामे ठप्प झाल्याचे आ. राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अंतरिम अधिसूचना निघेपर्यंत या गावांच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागातून ७० कोटी तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून ७० कोटी असे एकूण १४० कोटी निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.