महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांना घालताहेत साद ! डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने डोंगररांगा, पर्यटनस्थळे हिरवीगार झाली असून, निसर्ग सौदर्यात भर पडली आहे. परिणामी, पर्यटनस्थळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांना साद घालू लागली आहेत.

भोर तालुक्यात हिरवेगार डोंगर तसेच, पर्यटनस्थळांमुळे निसर्गाचा अदभूत खजिना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तालुक्यातील निसर्गसौंदर्य खऱ्या अर्थाने पावसात खुलते. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला हा तालुका असून, पुणे शहरापासून जवळच असणाऱ्या तालुक्यातील नेकलेस पॉईट, भाटघर नीरा – देवघर धरण, रायरेश्वर किल्ला, वरंधा घाटातील फेसळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

मागील तीन-चार दिवसांपासून वर्षाविहार करण्यासाठी तसेच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर, वाघातील डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे तरुण- तरुणीसाठी विलक्षण आकर्षण ठरत आहेत.

यंदा पावसाने जवळजवळ एक ते दीड महिना उशिरा हजेरी लावल्याने भोर तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. मात्र, १५ दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असल्याने डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून, धबधबे खळखळून वाहत आहेत. या धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी तरुणाई आकर्षित होत आहे.

पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते चकाचक

भोर तालुक्यातील पर्यटनस्थळे ही राज्यात प्रसिद्ध असून, दर वर्षी पर्यटनस्थळावर राज्यातील पर्यटकांची होणारी गर्दी पाहता आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकाना पर्यटनस्थळांकडे सुरक्षितपणे पोहोचता येत आहे.

बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार

वरंधा घाटातील कांदाभजी, वडापाव, मक्याची कणसे, भाजलेल्या शेंगा, तसेच गारमागरम चहा यासारख्या पदार्थांची खमंग चव चाखत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बहुतांशी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी बरोजगार तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय उभारल्याने तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office