Toll Plaza Rule:- आपण जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल नाक्यांवर टोल आकारला जातो. ज्या संस्थांकडून संबंधित राष्ट्रीय महामार्गाची देखभाल किंवा उभारणी करण्यात आलेले असते त्यांच्याकडून ही टोल आकारणी किंवा टोल वसुली केली जाते हे आपल्याला माहिती आहे.
परंतु या टोल प्लाझाच्या बाबतीत देखील काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेले असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या माध्यमातून टोल प्लाझांवर देखील आता वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही पावले उचलण्यात आलेली आहेत. परंतु बऱ्याचदा आपल्याला अनुभव आला असेल की टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झालेली असते व खूप दूरवरपर्यंत रांगा लागलेल्या असतात.
बऱ्याचदा यामध्ये अनेक वाहनचालकांना अजून देखील हे माहिती नाही की नेमका टोल कोणी भरायचा आहे व कोणाला भरावा लागत नाही. याबाबतीत देखील मोठा गोंधळ उडताना दिसून येतो.
याबाबतीत देखील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तत्वांचा विचार केला तर वाहनांच्या फक्त पाच प्रकार असे आहेत ज्यांना टोल नाक्यावर टोल भरावा लागत नाही म्हणजेच त्यांना टोल पासून सूट देण्यात आलेली आहे. त्याशिवाय काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला देखील विशिष्ट बाबतीत टोल भरताना सूट मिळण्याची शक्यता असते. याच बाबतीतली महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
या पाच प्रकारच्या वाहनांना टोल भरण्यात मिळते सूट
टोल प्लाझावर आपत्कालीन सेवा, संरक्षण सेवा, व्हीआयपी वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि दुचाकी या पाच प्रकारच्या वाहनांना कुठल्याही टोल प्लाजावर टोल भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. या वाहनांना टोल लागत नाही. यामध्ये आपण आपत्कालीन सेवेमध्ये ॲम्बुलन्स, अग्नीशमन दल आणि पोलिस वाहनांचा समावेश करू शकतो.
संरक्षण सेवेमध्ये लष्कर तसेच नौदल किंवा हवाई दलाच्या सेवेतील वाहनांना देखील सूट देण्यात आलेली आहे व व्हीआयपीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तसेच राज्य दौऱ्यावर असलेल्या परदेशी मान्यवरांना घेऊन जाणाऱ्या व्हीआयपी वाहनांना देखील टोल पासून सूट देण्यात आलेली आहे. तसेच यासोबतच सार्वजनिक वाहतुकीची वाहने व दुचाकी वाहने यांना देखील राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
या परिस्थितीत तुम्हाला देखील मिळू शकते टोल भरण्यापासून सूट
जर आपण काही प्रसिद्ध मीडिया रिपोर्टचा अहवाल पाहिला तर त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार काही वाहनांना काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये टोलपासून मुक्तता किंवा सूट मिळू शकते. यामध्ये जसे की वाहनांना 100 मीटर पेक्षा जास्त रांगेत उभे राहण्याची परवानगी नाही. टोल प्लाझांना प्रत्येक वाहन दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ एका वाहनासाठी देता येत नाही.
जर या अटी पूर्ण झाल्या नाहीत आणि रांग 100 मीटर पेक्षा जास्त असेल तर एनएचएआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार टोल कर्मचाऱ्यांना वाहनांची रांग 100 मीटरच्या आत येईपर्यंत वाहनांना विनामूल्य जाण्याची परवानगी द्यावी लागू शकते. ही शंभर मीटर रांगेची सूट नेमकी कोणाला लागू होते हे तपासण्याकरिता प्रत्येक टोल लेनमध्ये एक पिवळी रेषा आखलेली असते त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.