आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे.

जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेचा तपास सुरू केला असून, अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील विजय कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तीन दुकाने पहाटे फोडण्यात आल्याचे आढळून आले.

यामध्ये मोबाइल शॉपी, चपलांचे दुकान आणि किराणा दुकानाचा समावेश आहे. चोरट्यांनी किराणा दुकानातील गोण्यांमध्ये महागड्या चपला, बूट, मोबाइल शॉपीमधील महागडे मोबाइल आणि त्यांचे सुटे भाग चोरून नेल्याचे आढळून आले.

किराणा दुकानातही चोरट्यांनी चोरी केली. तेथील गावरान तुपाचे डबे, तेलाच्या बाटल्या यांच्यासह किंमती वस्तू चोरून नेल्या. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली असावी.

त्या भागात गस्त घालणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकाला दुकानांत चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने ही माहिती संजय गुगळे आणि तेजस कोठारी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

ज्यांची दुकाने फोडण्यात आली होती, त्या दुकानदारांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पथकासह येऊन घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24