शेवगाव :- राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली, मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे मदतीत हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करावी, अशी मागणी करत एका तरुण शेतकऱ्याने आपल्या खात्यावर प्रत्यक्षात मदत मिळण्याआधीच आठ हजार रुपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टद्वारे राज्यपालांना पाठवला आहे.
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. गुंठ्याला अवघ्या ऐंशी रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी करत उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथील रवी रावसाहेब देशमुख या तरुण शेतकऱ्याने हेक्टरी मिळणारी आठ हजारांची मदत राज्यपालांना धनादेशाद्वारे बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत परत केली.
त्यांनी राज्यपालांना पत्रही लिहिले असून त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान, सरसकट कर्ज माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीप पिकांचा विमा तत्काळ लागू करावा आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम वार्षिक साठ हजार रुपये करण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत. देशमुख यांना साडेसात एकर शेती असून त्यांच्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मुंगी (ता. शेवगाव) येथे साडेतीन एकर शेतजमीन आहे.