अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-राहुरी : आर्थिक परिस्थितीती जेमतेम…तिच्या घरातील परिस्थिती बिकट, तरीही तिने हार मानली नाही. संकटांसोबत ती दोन हात करीत वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे.
रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला आहे. घरात आहे वृद्ध आजी- आजोबा, आई. भाऊ आहे. भाऊ मतीमंद असून तो शिर्डी येथे मूकबधिर विद्यालयात नववीत आहे.
दुसरा भाऊ तिच्याच शाळेत पाचवीत शिकतोय. अवघी दोन एकर शेती. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. घरची आर्थिक परिस्थितीती बेताची रेणुकाचे वडील राहुल त्रिंबक डोंगरे (वय 40) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात.
अकरा वर्षांपासून त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलेसिस) करावे लागते. त्यांच्या दोन भावांना असाच आजार होता. आजी-आजोबांनी त्यांना आपल्या एकेक किडन्या दिल्या.
परंतु, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही चुलत्यांचे निधन झाले. त्यामुळे रेणुकाच्या वडिलांची किडनी प्रत्यारोपण करण्याची तयारी नाही. वडिलांना रक्तशुद्धीकरणासाठी नगर येथे आनंदऋषीजी रुग्णालयात न्यावे लागते.
दहा वर्ष आजोबा त्यांना दुचाकीवरून राहुरीला व तेथून एसटीने नगरला न्यायचे. आजोबांना प्रवास सहन होईना. त्यांची जबाबदारी रेणुकाने घेतली. दुर्दैवाने एक वर्षापूर्वी तिची दुचाकीची चोरी गेली.
महिन्याला दहा-बारा हजार रुपये दवाखाना खर्च. त्यात दुचाकी चोरी. बिकट परिस्थितीत भर पडली. रेणुकाने पैसे वाचविण्यासाठी वडिलांचा रेल्वेने प्रवास सुरु केला.
दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. रेल्वे, एसटी बंद झाली. तिचा संघर्ष वाढला. पैसे जमवून जुनी दुचाकी खरेदी केली. त्यावर तीन महिने वडिलांना नगरला नेले.
सात दिवसांपूर्वी तिचे वडिल कोरोनाग्रस्त आढळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती संघर्ष करताना दमलीय असं नाही.
परंतु कोणी आर्थिक मदत दिली तर तिचा वेळ वाचले. आणि ती दहावीच्या अभ्यासात लक्ष घालील. दानशूर व्यक्तींनी रेणुकाच्या मदतीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved