अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जनता भरडली आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना आर्थिक अडचण भासत आहे.
त्यामुळे नागरिकांना आर्थिक मदतीची गरज असताना मोदी सरकारने मात्र आर्थिक पॅकेजच्या नावाने केवळ जनतेची दिशाभूल केली आहे.
ही जनतेची क्रूर थट्टा केली आहे. आर्थिक मदत पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे,
अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याने
आता जनतेला तहान लागली असताना स्वत:च कर्ज घेऊन विहीर खोदा, असा आत्मनिर्भरतेचा सल्ला केंद्र सरकार देत आहे, असेही थोरात म्हणाले.
तीन दिवसांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाही केलेल्या योजनेतील अनेक योजना यापूर्वीच अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत.
मधमाशीपालन, कोल्ड स्टोरेज आणि गोदामे याबाबतच्या योजना आधीच अस्तित्वात आहेत. आज शेतक-यांना आपली उत्पादने कशी विकायची
याची चिंता असताना गोदामे बांधून शेतकरी कसा जगेल? असा प्रश्न थोरात यांनी केला. फसव्या योजना आखून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यापेक्षा
राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरजू नागरिकांच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी, असेही थोरात म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com