अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुकडी कालव्यावर पुणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केला आहे.
ते म्हणाले २९ एप्रिल २०२० रोजी कालवा-सल्लागार समितीची दृकश्राव्य बैठक झाली. त्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ६७ बंधाऱ्यांना दोन टीएमसी पाणी द्यावे, ही मागणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली. त्यावेळी हे को.प. बंधारे कुकडीच्या लाभक्षेत्रात येत नाहीत. असा स्पष्ट विरोध आमदार बबनराव पाचपुते यांनी केला.
त्याच दिवशी कुकडीचे पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदामंत्री आणि त्यांचा विभाग यांना करता आले असते. परंतु जलसंपदा मंत्र्यांनी कुकडी ला पाणी सोडण्याचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. असा निर्णय करून कुकडीचा पाणी प्रश्न लांबणीवर टाकला. हे श्रीगोंदे तालुक्यातील नौटंकी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिसत नाही का?
ना. जयंत पाटील यांनी आमदार बबनराव पाचपुते यांना बैठकीत अशी सूचना केली होती की, तुमचे लेखी म्हणणे मला पाठवा. त्याप्रमाणे आ. पाचपुते यांनी त्याच दिवशी कुकडी डावा कालवा उन्हाळी हंगाम आवर्तन क्रमांक २ चे नियोजन करण्याबाबत लेखी पत्र दिले आणि त्यात सूचना केल्याकी, डिंभे डाव्या कालव्यातून आणि माणिकडोह धरणातून नदी द्वारे तातडीने येडगाव धरणात पाण्याचे फीडिंग करून घ्यावे.
आणि २० मे २०२० पासून कुकडीचे आवर्तन सुरू करावे. दरम्यान पिंपळगाव जोगा धारणातील तीन -साडेतीन टीएमसी चा अचल साठा येडगाव धरणात घेऊन हे आवर्तन सलग करावे. मे महिन्यात आवर्तन सुरू झाल्यास पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण असलेल्या कुकडी डाव्या कालव्यावरील सर्व उद्भवांना पाणी उपलब्ध होऊ शकेल.
आ. पाचपुते यांनी २९ एप्रिल २०२० रोजी लिहिलेल्या पत्राला जलसंपदा मंत्र्यांनी २९ मे पर्यंत उत्तर दिले नाही. त्यामुळे २९ मे २०२० रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन आ. पाचपुते यांनी उपोषण जाहीर केले. ही बातमी श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना समजल्यानंतर त्यांनी पुण्यात आलेल्या जलसंपदामंत्री यांना पाणी सोडण्यासाठी सांयकाळी निवेदन देऊन नौटंकी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व ते निवेदन देतानाचे फोटो व्हॉट्स अपवर टाकून स्वतःच्या नौटंकी मध्ये आणखी भर घातली.
आ. पाचपुते आणि प्रा. राम शिंदे यांनी पाठपुरावा केला नसता तर ६ जूनला सुटणारे कुकडीचे आवर्तन जलसंपदा विभागाने आणखी लांबविले असते. श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे पुणे जिल्ह्याच्या नेत्यांपुढे काहीही चालत नाही. परंतु हेच नेते उसने अवसान आणून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुकडीच्या पाण्यामध्ये श्रीगोंदे तालुक्याची गळचेपी होते. म्हणून राष्ट्रवादीत येण्यापूर्वी ज्यांनी ना.दिलीप वळसे-पाटील यांना टार्गेट करून त्यांच्यावर आरोप केले होते, तेच नौटंकी नेते आता ना. वळसे यांच्याविरोधात एक शब्दही बोलत नाहीत. हे शेतकऱ्यांना चांगले समजते. दि. २९ एप्रिल २०२० ला दृकश्राव्य बैठक झाल्यानंतर त्याच दिवशी पत्र देऊन जलसंपदा मंत्र्यांना नियोजन करण्यासाठी आमदार पाचपुते यांनी संधी दिली होती.
तरीही जलसंपदा विभागाला नियोजनही करता आले नाही आणि पत्राचे उत्तरही देता आले नाही. हिंमत असेल तर श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नौटंकी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. असे आवाहनही श्री नागवडे यांनी केले आहे.
जोपर्यंत कुकडीच्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे, तोपर्यंत श्रीगोंदे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उसन्या प्रतिक्रिया देण्याचे प्रयत्न करू नयेत. श्रीगोंदे तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेत्यांपुढे कसे नतमस्तक होतात व म्याव मांजर होतात हे आम्ही पुराव्यानिशी दाखवून देऊ ,असेही नागवडे म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews