Maharashtra News : यंदा उष्मा आणि बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होईल की काय, या आशंकेने आंबा उत्पादक सध्या चितमध्ये आहेत. दुसरीकडे फळांच्या राजाची मनसोक्त चव चाखायला मिळणार की नाही, असा विचार आंबाप्रेमी करत आहेत.
हवामान खात्याने देखील तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवून या काळजीत भरच टाकली आहे. पण भारतीय कृषी संशोधन परिषद-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर या संस्थेने उष्णतेचा आंबा उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारली असून,
उलट यंदा आंब्याच्या उत्पादनात १४ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे पाहता या वर्षी मनसोक्तपणे आमरस ओरपता येणार आहे.
भारतीय हवामान विभागाने आपल्या ताज्या अहवालामध्ये उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे ही उष्णतेची लाट नेहमीच्या दोन ते चार दिवसांऐवजी १० ते २० दिवस टिकू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय कृषी संशोधन परिषद-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी. दामोदरन म्हणाले की, एप्रिल-मेमधील संभाव्य उष्णतेच्या लाटेचा आंब्याच्या उत्पादनावर विशेष परिणाम होणार नाही.
मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी फळांची गळती कमी करण्यासाठी मे महिन्यात सिंचनाची काळजी घेणे गरजेचे आहे.
अनुकूल हवामानामुळे आंब्याला फुलोरा
आंब्यातील फुलांची प्रक्रिया फळ धारणेसाठी महत्त्वाची आहे. अनुकूल हवामानामुळे आंब्याला फुलोरा आला असून परागीभवन सुरळीत झाले आहे, त्यामुळे फळे येण्यास सुरुवात झाली आहे. आंबा पिकाची शक्यता अजूनही चांगली आहे.
सामान्य उष्णतेमुळे उत्पादनावर परिणाम होत नाही, तर अप्रत्यक्षपणे पिकाला मदत होते, असेही दामोदरन म्हणाले.
उत्पादन २.४ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज
२०२२-२३ पीक वर्षातील २.१ कोटी टनांच्या तुलनेत या वर्षीच्या पीक वर्षात (जुलै-जून) आंब्याचे एकूण उत्पादन २.४ कोटी टनांपर्यंत जाऊ शकते. देशाच्या एकूण उत्पादनात ५० टक्के योगदान देणाऱ्या दक्षिण भारतात आंब्याचे बंपर उत्पादन होत आहे.
गेल्या वर्षी हवामानातील गडबडीमुळे दक्षिणेकडील राज्यांना १५ टक्के नुकसान सहन करावे लागले होते.
आंबा उत्पादकांनी अशी काळजी घ्यावी
■सामान्य उष्णतेपेक्षा जास्त उष्णता असल्यास शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक
■हलके सिंचन करून जमिनीतील ओलावा राखवा. नियमित पाणी दिल्यास झाडावरील फळे गळण्याचे प्रमाण कमी होते.
■उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील आंबा उत्पादक भागात कीटकांच्या हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगावी.