Maharashtra News : मुंबई – गोवा महामार्गावर इंदापूरपासून पश्चिमेला तळा शहराकडे येताना १२ किमी. ला डाव्या बाजूला वावे धबधबा आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली, हे सत्य असले तरी कमी वेळात तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे.
त्यामुळे तळा तालुक्यातील नद्या, तलाव, विहिरी तसेच धबधबे ओसांडून वाहत आहेत. अशाच प्रकारे वावे येथील धबधबा भरून वाहू लागला असून त्यातून पडणारे फेसाळयुक्त पाणी येथील निसर्गसौंदर्यात भर घालू लागल्याने हा धबधबा दूरवरूनच पर्यटकांना खुणावू लागल्याचे दिसत आहे.
जोरदार पावसामुळे एकीकडे वावे धबधब्यातून पांढरे शुभ्र फेसाळयुक्त पाणी धो धो वाहत आहे. तर दुसरीकडे, धबधब्याच्या आजूबाजूचा हिरवेगार मनमोहक निसर्ग साऱ्यांचे लक्ष वेधत असल्याचे दिसत आहे. त्यातच पक्ष्यांचा किलबिलाट,
बहरलेली वृक्षवल्ली, धबधब्यातील पाण्याचा खळखळाट येथील निसर्ग सौंदर्यात भर घालत आहे. धबधब्यावरून कोसळाऱ्या पाण्याचा विशिष्ट स्वर कानी पडताच पर्यटकांची पावले आपोआपच या धबधब्याकडे वळत असून अनेकजण येथे चिंब होण्याचा आनंद घेण्यासाठी या धबधब्याला भेट देत आहेत.
पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वावे धबधबा उत्तम असल्याने मुंबई, पुण्यातील असंख्य पर्यटक या धबधब्याला भेट देतात. या धबधब्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने अनेक जण सहकुटुंब येथे येणे पसंत करतात.
तळा शहरापासून जवळच असल्याने तरुणाईचे या धबधब्याकडे विशेष आकर्षण आहे. फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त भिजण्यासाठी तरुणाई या धबधब्याकडे वळते. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हा धबधबा वेगाने वाहू लागला असून शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकाची प्रचंड गर्दी पाहावयास मिळणार असल्याचे मानले जात आहे.
जवळच वावे गाव असल्याने पर्यटकांना चुलीवरच्या भाकऱ्या, शाकाहारी, मांसाहारी जेवण ऑर्डर दिल्यास बनवून मिळते. त्यामुळे वावे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनत आहे.
सध्या पडलेल्या पावसामुळे तळा तालुक्यातील वावे येथील धबधबा ओसंडून वाहू लागला असून या धबधब्याचे आकर्षक रूप आता पर्यटकांना खुणवू लागले आहे. तळा तालुका डोंगराळ निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतात.