Maharashtra News : भगवान भाक्तीगड (घाट सावरगाव, ता. पाटोदा ) येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि. २४) रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केले.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी शेवगाव तालुका दसरा मेळावा कृती समितीची बैठक आज शेवगाव येथे अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. मुंडे म्हणाले, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेला हा दसरा मेळावा ऊसतोडणी कामगार व कष्टकरी शेतकऱ्यांना ऊर्जा देणारा असतो, स्व. मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा सुरु ठेवली असून,
यावर्षीचा मेळावा अनेक अर्थाने ऐतिहासिक होणार आहे, त्यामुळे सर्वांनी यात सहभागी व्हावे. शेवगाव तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी अमरापूर येथे सकाळी एकत्र यावे तेथून एकत्रितपणे जाण्याचे नियोजन असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
बैठकीस ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, ढोरजळगावने चे सरपंच गणेश कराड, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रा. अशोक गाढे, बाळासाहेब कोळगे, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष नितीन फुंदे, हसनापूरचे माजी सरपंच अर्जुन ढाकणे, विलास फाटके, अभय पालवे, हनुमंत बेळगे, बंडू जवरे, मनोज पाखरे, गणेश जायभाये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.