शेतकर्यांना डोळ्यात पाणी आणण्याची वेळ …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- कांद्याचे भाव गेल्या चार दिवसात 2200 रुपयावरून 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल घसरल्यामुळे शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे.

अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यात लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

गेल्या आठवड्यात कांद्याचे दर १५०० प्रति क्विंंटल होते. आज सहाशे ते आठशेपर्यंत खाली आले आहेत. कोरोनोमुळे शेतमालाला उठाव नाही, परराज्यातील शेतमालाची वाहतूक ठप्प आहे.

राज्याच्या सीमाही बंद आहेत. वाहतूक थांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.लॉकडाउन काळात बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

राज्यासह जिल्ह्यामध्ये १४ एप्रिलपर्यंत जमावबंदी, संचारबंदी घोषित केल्यामुळे विक्रीअभावी कांदा शेतातल्या पोळीमध्ये सडत आहे. ग्रामीण भागात बहुतांशी शेतकरी बांधावरच कांद्याची विक्री करतात.

जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारीदेखील शेताच्या बांधावरच कांदाखरेदीला प्राधान्य देतात; परंतु जिल्ह्यासह राज्याच्या सीमा बंद असल्याने सर्वच शेतमालाची वाहतूक ठप्प आहे. बाजार समित्यामधील व्यापारी ठराविक क्षमतेपर्यंत कांदा खरेदी करत असल्याने शेतकर्री हतबल झाला आहे.

लॉकडाउन काळात शेतमालाला उठाव नसल्याचेच चित्र आहे. ग्रामीण भागात ४० टक्केच शेतकऱ्यांकडे कांदाचाळी उपलब्ध आहेत. बाकीचे शेतकरी बाजार समित्या तसेच शेताच्या बांधावर कांद्याची विक्री करतात. व्यापारीही पडेल भावात कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24