नाशिक ते मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. दुपारी आणि रात्री काही विशिष्ट तासांत या गोदामांमधील अवजड वाहनांना महामार्गावरून मार्गक्रमण करता येईल. तसेच महामार्गावरील खड्डे बुजवण्याचेही निर्देश देण्यात आले असून ते कामदेखील लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
महामार्गाला ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई यादरम्यानचा १५० किलोमीटरचा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर गेला आहे. या त्रासामुळे अनेक मंत्री महामार्गाने येणे टाळून रेल्वेने नाशिकला ये-जा करतात. पावसामुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे.

त्यातच महामार्गाचा भिवंडी बाह्यवळण रस्त्यापर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन यंत्रणांकडे विभागून असल्याने त्रांगडे निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.
भिवंडी शहरात सुमारे ४० ते ४५ हजार गोदामे असून त्या ठिकाणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून वाहने येतात. या वाहनांमुळे माणकोली ते अंजूर चौक, काल्हेर ते अंजूर फाटा आणि अंजूर फाटा ते ७२ गाळे या भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी होऊ लागल्याने भिवंडीकर हैराण झाले आहेत.
तसेच नारपोली परिसरात अरुंद रस्ते असून सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. कल्याण आणि भिवंडीहून ठाणे शहरात रुग्णांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
त्याचप्रमाणे नोकरदार, विद्यार्थी आणि इतर वाहन चालकांनाही याचा फटका बसतो त्याचबरोबर वेळ आणि इंधनाचा मोठ्याप्रमाणावर अपव्यय होतो. हे लक्षात घेऊन भिवंडी परिसरातील गोदामांतील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची तयारी केली जात आहे.
यात दुपारी आणि रात्री काही तास निश्चित करून त्या वेळेतच अवजड वाहनांनी महामार्गावर प्रवेश करावा, असे नियोजन केले जात असल्याचे भुसे यांनी सांगितले. यापूर्वी अवजड वाहनांसाठी दुपारी १२ ते ४ आणि रात्री १२ नंतर वाहतुकीला मुभा दिली गेली होती. त्या धर्तीवर हे नियोजन केले जात आहे.
अवजड वाहनांसाठी वेळमर्यादा
नाशिक-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी पुलांची कामे सुरू असून तेथील सेवा रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा होतो, ही वस्तुस्थिती आहे. वाहतूक सुरळीत राखण्यासाठी खड्डे त्वरित बुजवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. तेथील अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळेचे नियोजन केले जात आहे. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले.