पुन्हा मुसळधार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे ऐन थंडीत पावसाने जोर धरला आहे.

तसेच पुढचे 48 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बदललेलं वातावऱण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळबागा शेतमालाचं नुकसान होईल अशी चिंता बळीराजाला पडली आहे.

यातच अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात शनिवारी सायंकाळी 6 वा.मुसळधार पावसाने हजेरी लावली. साधारण दीड तासापेक्षा अधिक वेळ सुरु असणार्‍या मुसळधार पावसाने लोकांच्या मनात धडकीच भरली.

मुसळधार पावसात वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्याने अंधारात आभाळातून कोसळणा-या धारांनी ढगफुटी झाल्याचाच भास काही काळ झाला.उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान या पावसाने केले.

डिसेंबरात लागवड झालेल्या कांदा पिकात पाणी साचून त्यावर बुरशीचा मोठा प्रादुर्भाव होईल.नवीन लागवड झालेल्या कांद्याची तर पुरती विल्हेवाट लागली.त्यात पाणी साचून मूळे पुर्णपणे कुजून जातील.

परिणामी उशिरा लागवड झालेला कांदा सगळाच हातातून गेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी करुन शासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.सततच्या ढगाळ वातावरणाने शेतीची मोठी हानी झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24