Maharashtra News : मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तसेच पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांना बदली आदेशात दिल्याप्रमाणे बदली झालेल्या नवीन पोलीस ठाण्यांत रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिले आहेत. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक २७, सहाय्यक पोलीस निरीक्षक ६० व पोलीस उपनिरीक्षक ११२ अशा एकूण १९९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.