तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- स्थानिक रेल्वेचा अधिकार राज्य सरकारला मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सात मधील केंद्रीय विशेष सुचीचा रविवार दि.27 डिसेंबर रोजी सत्यबोधी सुर्यनामा करण्यात येणार आहे.

तर महिलांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणार्‍या तृप्ती देसाई यांना शक्तीकर्मा लॉरिस्टरचा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सात मधील केंद्रीय विशेष सूची मधील 22 नंबरचा रेल्वे हा विषय त्या परिशिष्टाच्या सामायिक यादीमध्ये समावेश न झाल्यामुळे देशात रेल्वेचे जाळे पसरण्यास मर्यादा आल्या आहेत. जपानसह इतर अनेक राष्ट्रांनी स्थानिक रेल्वेचे खाजगीकरण करुन जनतेला मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करुन दिल्या.

स्थानिक रेल्वेचा अधिकार राज्य सरकारला मिळाल्यास अहमदनगर, औरंगाबाद व नाशिकला देखील मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध करता येणार आहे. नवीन रेल्वेमार्ग खाजगी गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात पसरविता येणार आहे. राज्यात खाजगी तत्वावर महामार्ग विकसीत करुन टोलनाके उभे करण्यात आले.

त्याप्रमाणे देखील राज्यातील रेल्वेचा खाजगीकरणद्वारे विकास साधता येणे शक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. घर बांधण्यासाठी घरकुल वंचितांच्या चळवळीत नेहमीच महिलांचा पुढाकार राहिलेला आहे. या चळवळीत पुरुष पुढे येण्यास तयार नाही. महिला निवार्‍याच्या हक्कासाठी भांडत आहे.

महिलांवर घराची जबाबदारी असताना त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून, निवांत बसून घरे मिळणार नाही. यासाठी योगदान द्यावे लागणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24