भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या आसामस्थित प्रादेशिक केंद्राने क्षयरोगाच्या चाचणीसाठी किफायतशीर तंत्रज्ञान विकसित केले आहे.
त्यामुळे अवघ्या ३५ रुपयांत रुग्णाची क्षयरोग चाचणी शक्य होणार आहे. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नवीन पद्धतीत चाचणीसाठी कमी वेळ लागणार आहे.
नवीन ‘सीआर आयएसपीआर केस-आधारित क्षयरोग निदान प्रणाली’त तीन टप्पे असून, ही चाचणी जास्त गुंतागुंतीची नाही. या चाचणीत एकाच वेळेस अडीच तासांत १५०० हून अधिक नमुण्यांची चाचणी केली जाऊ शकते.
रुग्णाच्या लाळेचा नमुणा घेत अवघ्या ३५ रुपयांत ही चाचणी शक्य आहे. क्षयरोगाच्या पारंपरिक निदान पद्धतीत सामान्यतः ४२ दिवसांचा कालावधी लागतो. ही चाचणी माइक्रोस्कोपी आणि न्यूक्लियड अॅसिडवर आधारित पद्धतीवर काम करते.
या चाचणीस बराच वेळ लागतो आणि काही गुंतागुंतीच्या उपकरणांची देखील आवश्यकता असते. पण आयसीएमआरच्या आसाममधील डिब्रुगडस्थित प्रादेशिक केंद्राने विकसित केलेली नवीन चाचणी पद्धत ही किफायतशीर आणि वेळ वाचविणारी आहे.
जागतिक स्तरावर क्षयरोग हे एक मोठे आव्हान बनलेले आहे. त्यामुळे आजार व्यवस्थापनासाठी अचूक व गतिमान निदान उपकरणांची गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेत नवीन पद्धत विकसित करण्यात आली आहे.
आयसीएमआरने आता या नवीन तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी पात्र संस्था, कंपन्या आणि उत्पादकांना आमंत्रित केले आहे. प्रणालीचे उत्पादन करण्याच्या सर्व टप्प्यात प्रादेशिक केंद्राकडून मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाचा निदानास लागणार वेळ हा वाचणार आहे. तसेच पैशाचीही बचत या चाचणीमुळे होणार आहे.