अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- काही समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे झालेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ह्या बाबत सविस्तर वृत्त असे कि थाटामाटात दोन्ही मुलींची लग्नं झाली, आईला जीव सार्थकी लागल्याचा आनंद झाला. पण लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी दोन्ही मुलींना सासरवाडीत कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागले.
चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत पाच दिवसानंतर सासू आणि पतीने दोन्ही नववधूना कोल्हापूरला माहेरी पाठवले. परत घेऊन न जाता जात पंचायत बोलावून काडीमोड घेतला. कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील दोन मुलींची ही दुर्देवी कहानी समोर आली आहे.
कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील एका धुणी भांडी करत घर सांभाळणाऱ्या एका महिलेने अनिसकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या समाजात जात पंचायतीच्या नावाने सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटली.
जेवणाचे निमित्त करून दोघींना एका पाहुण्यांच्या घरी नेले. तेथे त्यांची कौमार्य चाचणी घेतली. या चाचणीत नापास झाल्याचा आरोप करत त्या दिवसापासून छळ वाढला. ‘तु आत्महत्या कर, नाही तर माहेरी निघून जा’ म्हणून तगादा सुरू झाला.
एका मुलीचा पती तर सैन्य दलात. मला तीन खून माफ आहेत, तू आत्महत्या कर नाही तर मीच तुला गोळ्या घालीन… या सैनिकाचा रोजचा दम. सासूदेखील या छळात सहभागी. पाच दिवसानंतर दोघींना माहेरी पाठवले. नंतर मात्र त्यांनी त्यांना सासरी येण्यास मज्जाव केला.
अनेकदा विनंती करूनही मुलींना सासरी पाठविण्यास विरोध झाल्यानंतर आईचा संयम सुटला. मुलींची लग्न झाली, म्हणून आनंदीत असणाऱ्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर न्याय मागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
त्याचाच एक भाग म्हणून जात पंचायत बसली. सासू काही नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचली. जात पंचायतीने कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत काडीमोड घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला. डमी नवरा उभा करून त्याने बाबळीची काडी मोडली. झाला घटस्फोट.
या अमानुष न्यायानंतर आई आणि दोन्ही निराधार मुलींना आकाशच कोसळल्याचा अनुभव आला. त्यांनी अनिसकडे तक्रार केली. अनिसने पुढाकार घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दोन्ही पतीसह सासूवर गुन्हा नोंद झाला आहे.