अहमदनगर :- नगर शहरातून चारचाकी वाहन चोरुन नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. या कारवाईत पोलिसांनी गणेश शिवाजी लोखंडे (वय २०, रा.लोंढे मळा, केडगाव), संकेत सुनील खापरे (वय २१, रा.विनायक नगर, अ.नगर) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीची स्विफ्ट कारही जप्त केली.
याबाबतची माहिती अशी की, विजय प्रभाकर लटंगे (रा.सिडको, औरंगाबाद) हे यांनी त्यांच्या मालकीची स्विफ्ट गाडी (एम.एच.२०, ए.जी.६७५८) नगरमधील त्यांचे मित्र शशिकांत शिवाजी देशमुख (रा. सिद्धविहार अपार्टमेंट, बोरुडे मळा) यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये पार्किंग करुन ते मुंबईला गेले असता त्यांची कार दि.२५/११ रोजी चोरीस गेली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या घटनेतील चोरीची कार ही गणेश लोखंडे याने चोरी असून तो सुपा एमआयडीसी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सुपा एमआयडीसी चौक येथे नजर ठेवली असता त्यांना सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमधून पुणे रोडने एमआयडीसीकडे दोन इसम जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून कारविषयी चौकशी केली असता त्यांनी कार बोरुडे मळा येथून चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांना अटक करुन मुद्देमालासह तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील जमादार सोन्याबापू नाणेकर, हे.कॉ. विजय वेठेकर, पो.ना.रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, संदीप चव्हाण व प्रकाश वाघ यांनी केली आहे.