Uddhav Thackeray Politics:- सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर गेल्या दीड ते दोन वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारणाचा पूर्ण चिखल झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून सोबत काही आमदार घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी असा प्रवास केला तेव्हाच राजकारणाचा चिखल झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली व त्यानंतर शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? याबाबत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे निकाल आले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत.
परंतु हे जे काही शिवसेनेच्या बाबतीत घडले त्याची पाळेमुळे जर आपण बारकाईने शोधली किंवा त्याचे कंगोरे शोधले तर ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला शक्यतो सापडतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती होती व महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे या युतीला कौल दिला होता व यामध्ये भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा असे मिळून 161 जागांचे बहुमत मिळाले होते.
परंतु त्याच कालावधीत नेमकी कुठे माशी शिंकली हे कुणालाच कळलं नाही का उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा अचानक मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जागी झाली. त्यानंतर मात्र सगळे संस्कार किंवा संस्कृती, शिवसेनेचे विचारधारा सोडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली व महाराष्ट्राच्या सत्ता पटलावर मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर विराजमान झाले.
परंतु मात्र या सगळ्या राजकीय परिस्थितीचे जे काही चांगले किंवा वाईट परिणाम असतील ते आज उद्धव ठाकरे यांना भोगावे तर लागत नाही ना? अशी परिस्थिती एकंदरीत आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि भाजप यांच्याकडून देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात.
बंद दाराआड झालेल्या चर्चा मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द अमित शहा यांनी दिलेला होता असा आरोप उद्धव ठाकरे करतात तर अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा शब्द अमित शहा यांनी दिला नव्हता असा आरोप किंवा उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर भाजपकडून कायम दिले जाते.
परंतु आज महाविकास आघाडी सोबत राहुन उद्धव ठाकरे यांना काय मिळाले? आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय मिळेल? हे तर आता महाराष्ट्रातील मतदार ठरवतीलच. परंतु ही सगळी जी काही परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून स्वतःवर ओढवून आणलेली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्या नेतृत्वात होत्या का काही मर्यादा?
जेव्हा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.तेव्हा महाराष्ट्राचा सारा कारभार त्यांच्या हाती आल्यानंतर मात्र काही गोष्टींमध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या. असे म्हटले जाते की उद्धव ठाकरे यांना सुरुवातीला संसदीय शिष्टाचार देखील माहिती नव्हते व राज्यातील प्रश्नांवर त्यांची अजिबात मांड नव्हती.
भाजप आणि इतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर कायम आरोप केला जातो की ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त काही तास मुख्यमंत्री कार्यालय मध्ये गेले होते व यावेळी देखील विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे सौजन्य देखील त्यांनी दाखवलेले नाही.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले तोपर्यंत त्यांना त्याबाबत देखील काहीच माहिती नव्हते व यावरूनच त्यांचे नेतृत्वाच्या मर्यादा आपल्याला स्पष्टपणे जाणवतात.
झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मिळालेला कौल मतदार त्यांच्या बाजूने आहेत की नाही हे दाखवणारा
झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जरी घवघवीत यश मिळवले. परंतु निवडून आलेल्या जागेच्या तुलनेमध्ये जर आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कामगिरी पाहिली तर ती सगळ्यात मोठी निराशा जनक अशीच म्हणावी लागेल.
लोकसभा निवडणुकीचे जर आपण एकंदरीत विश्लेषण केले तर यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांनी स्वतःच्या उमेदवारांसाठी किंवा स्वतःच्या पक्षाच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर तर करून घेतला नाही ना? एकंदरीत या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूची जी काही मते होती ही बऱ्याच ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाली.
परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे काही मते होती ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाले नाहीत असेच आपल्याला दिसून येते. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहून देखील लोकसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजीच केली असे आपल्याला म्हणावे लागेल व याच गोष्टीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार नाही?
याबाबत कोणालाच खात्री देता येणार नाही. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात की काय? असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे.तसेच उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची उंबरे झिजवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली वाहिली की काय असे आपल्याला वाटले नाही तरच नवल.
शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की, ज्यावेळी मला काँग्रेस सोबत हात मिळवणी किंवा काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा मी माझे दुकान बंद करेन. परंतु या सगळ्या शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजलीच उद्धव ठाकरे यांनी वाहिली असे आपल्याला म्हणायला वाव आहे.
बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख होते तेव्हा दिल्लीतील कितीही बडे नेतेमंडळी असली तरी त्यांना मातोश्रीवर यावे लागायचे व हे तितकेच सत्य आहे. परंतु आपल्याला आता सगळी उलट परिस्थिती दिसते. आता उद्धव ठाकरे यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात.
काही गोष्टीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील उद्धव ठाकरे यांची करते हेळसांड?
जर आपण सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहरा याबाबत जर काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या त्यांच्या काही नेत्यांची जर विधाने ऐकली तर ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वकांक्षेला किंवा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मतालाच विरोध करता की काय अशी परिस्थिती आहे.
एकंदरीत राजकारणातील उद्धव ठाकरे यांची सध्याची परिस्थिती पाहिली तर त्यांच्याबद्दल मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा आहे असे आपल्याला दिसून येते. त्यांच्या दिल्ली वाऱ्या किंवा मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे राज्यातील काँग्रेसचे जे काही नेते आहेत ते अस्वस्थ झाले आहेत की काय अशी परिस्थिती आहे.
कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत तीव्र नापसती व्यक्त केली आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही असे बोलून उद्धव ठाकरे यांच्या मनातील किंवा शिडातील हवाच काढून घेतली की काय अशी परिस्थिती आहे.
या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे चव्हाण यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे व महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री पदाबाबत तशी भूमिका घेतल्याचे आपल्याला दिसून येते. जेव्हा सत्ता मिळेल ही अपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादीला होती तेव्हा उद्धव ठाकरे हे त्यांच्या गळ्याचे ताईत होते.
परंतु आता हेच उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटाला नाकापेक्षा मोती जड याप्रमाणे वाटायला लागलेत की काय असे आपल्याला दिसून येते. जर आपण नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जरी बघितले तरी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिलेला होता.
परंतु असे असताना देखील उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला व यामध्ये नार्वेकर निवडून आले व त्यामुळे शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर मात्र शरद पवार यांनी यावर जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती.
उद्धव ठाकरे यांची आज असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गरज संपली की काय?
उद्धव ठाकरे यांनी 2019 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करून महाविकास आघाडी उदयास आणली व महाराष्ट्राच्या सत्ता पटलावर महाविकास आघाडीची सत्ता येऊन स्वतः मुख्यमंत्री झाले व त्यांच्यासोबत काँग्रेस व राष्ट्रवादीने देखील सत्ता उपभोगली. लोकसभा निवडणुकीत मात्र उद्धव यांची मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खेचून आणली
परंतु त्या बदल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची किती मते उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळाली हा एक मोठा प्रश्न आहे? आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा डाव काँग्रेसचा दिसून येतो व त्या डावाला उद्धव ठाकरे शरण जातील की काय? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.