मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला.
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे बरोबर आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईतील रेनी सन्स या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
रविवारी शरद पवारां बरोबरच उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे ठाकरे यांना निलेश लंके यांच्या जवळ घेऊन गेले. आणि हाच तो निलेश लंके अशी ओळख करून दिली. पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करीत पाठीवर हात ठेवला.
तू अतिशय साधा माणूस आहेस. आम्हाला ओळखता आले नाही. पण आता आपण बरोबर आहोत अशा शब्दात त्यांनी आमदार निलेश यांना आपलेसे केले. दरम्यान शरद पवार यांची विशेष मर्जी संपादन केल्यानंतर आ. लंके हे शिवसेनेचे सर्वासर्वे उद्धव ठाकरे यांच्याही गुडबुकात पोहोचले आहेत. इतकेच नाही तर सेना नेतृत्वाला त्यांची दोन वर्षापूर्वीची चूक सुद्धा उमगली असल्याचे यावरून दिसून आले.