महाराष्ट्र

मराठवाड्यात अवकाळीचे थैमान..! १ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ११४ गावांतील ३ हजार २२३ शेतकऱ्यांना बसला असून विभागातील १ हजार हेक्टरवरील जिरायती,

बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १२१ जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक फटका बीड, लातूर जिल्ह्यांना बसला आहे.

९ ते १४ एप्रिल या पाच दिवसांत मराठवाड्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या पाच दिवसांच्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली. वीज पडून १० जण जखमी झाले तर १० जणांचा मृत्यू झाला.

लहान, मोठे, ओढकाम करणारे असे एकूण १५२ पशुधन दगावले. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३७ हेक्टर, जालना ९९०, परभणी ५३९, हिंगोली ३३०, नांदेड ८२०, बीड १६९३, लातूर ३२४, धाराशिव जिल्ह्यांत ३२१ हेक्टर बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले होते.

अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याचा फटका ११४ गावांतील ३ हजार २०० शेतकऱ्यांना बसला असून त्यांचे जवळपास १ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्यामुळे ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत वीज पडून १४ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत. लहानमोठी २७३ जनावरे दगवली आहेत. तर ५४४ घरांची ‘पडझड झाली आहे. मराठवाड्यातील एकूण ५९५ गावे बाधित झाली असून १२ हजार ३५० शेतकर्‍यांचे एकूण ६ हजार २५७ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शनिवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका बीड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांना बसला आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. अवकाळीमुळे नुकसानीमध्ये दिवसेंदिवस वाढच होऊ लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office