अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे.यातच नगर अर्बन मल्टिस्टेट शेडयुल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान नगर अर्बन बँके निवडणुकीत बरखास्त संचालक मंडळातील ८ संचालक पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या ८ जणांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी यासाठी दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सहकार पॅनलला मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळात असलेले ८ जण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज वैध ठरवल्याने त्यांच्या उमेदवारीला न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.