अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षात पंढरपुरमध्ये सहा मोठ्या यात्रा झालेल्या नाहीत. या काळात कोट्यवधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही.
मात्र, आता विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 20 महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. यंदा कार्तिकी यात्रेचा सोहळा भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
यात्रा कालावधीमध्ये मंदिरामध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विठ्ठलाच्या नित्योपचाराचा भाग म्हणून कार्तिकी यात्रेच्या ६ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठलाचा पलंग काढण्यात येणार आहे. या कालावधीत विठ्ठलाचे दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले राहील.
दिंड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांनी मागणी केल्यास त्यांना ६५ एकर परिसरात उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. चंद्रभागा वाळवंटामध्ये १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये मंडप टाकून कीर्तन,
प्रवचन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये मंदिरामध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमावलींचे काटेकोर पालन केले जावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.