मुंबई, 18 मे : ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं काल मध्यरात्री निधन झालं. मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे मतकरी यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समजतं आहे.
मृत्यू त्यांचं वय ८१ होतं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, मुलगी सुप्रिया, मुलगा गणेश, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अॅडमिट झाले असताना त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.
तिथेच त्यांचं देहावसान झालं. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. 1955मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. अलिकडेच आलेल्या अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस ही आलेली नाटकं देखील प्रचंड गाजली. या दोन्ही नाटकांचं लेखन मतकरींनी केलं होतं.
गूढ कथा यामध्ये मतकरींचा हातखंडा होता. मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत.
अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली.
वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.