‘या’दिवशी होवू शकतात विधानसभा निवडणुका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर ;- विधानसभेच्या प्रशासकीय कामांना गती आली आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याची चिन्हे असून त्यादृष्टीने निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी 31 तारखेला प्रसिध्द करण्यात येणार असून शनिवारी यादीवर निर्णय घेण्याचा अंतिम दिवस होता.

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना गती आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यालयांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागातील मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे. सर्वच जिल्ह्यांतील निवडणूक कार्यालयातील कामाची ही गती पाहता 13 किंवा 14 सप्टेंबरला निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याचे संकेत आहेत.

अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबरला आहे. ती होताच निवडणुकीचा बिगुल वाजेल. साधारणपणे 15 ऑक्टोबरला राज्यात एकाचवेळी मतदान होण्याची शक्यता आहे.

यामध्ये फक्त एक किंवा दोन दिवसाचा बदल होईल. त्यानंतर चार दिवसांतच मतमोजणी होईल. दिवाळी 25 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. निवडणुकीचा निकाल आणि दिवाळी यात आठ दिवसाचा कालावधी राहणार आहे.

साहजिकच मंत्रिमंडळ यादी तयार करण्यास कमी वेळ मिळणार आहे. यामुळे नवीन मंत्रिमंडळ दिवाळीनंतरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.


अहमदनगर लाईव्ह 24