कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचे मागील लोकसभा निवडणुकीच्या मानाने मताधिक्य घटले असल्याचे पत्रक काढून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एकूणच कोपरगाव तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विजयाच्या जल्लोषात सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कट्टर अनुयायांना मात्र या गोष्टीचा विसर पडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात खा. लोखंडे यांना तब्बल ५५ हजार ६२७ एवढे मताधिक्य मिळाले होते; परंतु यावेळी १६ हजार ३२८ मतांची घट झाली आहे. आपण विजयोत्सव साजरा करत आहोत; पण मताधिक्य का घटले, याची चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे.
शिवसेना-भाजपा युती व मोदी विचार मंचचे कार्यकर्ते व लोकप्रिय आमदार जर प्रचारात होते, तर मग मताधिक्य घटण्याचे कारणच काय? असा सवाल करून याचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्याउलट शिर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र २०१४ च्या निवडणुकीपेक्षा २०१९ च्या मताधिक्यात तब्बल ५८ हजारांनी वाढ झाली आहे. विखे पिता-पुत्रांनी मित्र पक्षाच्या उमेदवारास ६२ हजार ८७१ मतांची आघाडी मिळवून देऊन खा. लोखंडे यांना मोठा विजय मिळवून दिला.
२०१४ ला आमदार अशोक काळे यांच्या काळात मोठे मताधिक्य मिळाले होते. ते २०१९ ला टिकले नाही. यावरही मंथन होणे गरजेचे आहे. विजयोत्सवाच्या नादात कुणीही आकडेवारी नजरेआड करू नये. बातम्या, हार, तुरे, प्रसिद्धी, हसरे फोटो, जल्लोष याला प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भुलून जाऊ नये.