अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जामखेड येथील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निमित्ताने राळेभात हे पाचव्यांदा संचालक म्हणून बँकेवर निवडून जाणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ संचालक जगन्नाथ तात्या राळेभात यांनी ‘भाजप’ कडून सोसायटी मदतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यांच्याविरूध्द आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या.
माजी मंत्री राम शिंदे हे राळेभात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत होते. परंतु राजकारणात कनेक्ट महत्त्वाचा म्हणतात तो यासाठीच… राम शिंदेंचा राळेभात यांच्याशी कनेक्ट कमी पडला आणि आणि ‘बिनविरोध’ निकालाचा चेंडू आमदार पवार यांनी स्वतःच्या कोर्टातून टोलवला.
जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले होते.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. आमदार रोहित पवारांच्या आदेशानंतर पुढचं नियोजन सुरु झालं. त्यानुसार आता राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
रोहित पवार यांनी सुरेश भोसले यांना अर्ज मागे घ्यायला लावून तसंच ऐनवेळी विखेंशी छुपी युती करुन राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’ दाखवून दिला यापुढच्या निवडणुकांसाठी रोहित पवारांचं हे बेरजेचं राजकारण महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसला असून ते बॅकफूटवर गेले आहेत.
जामखेड सोसायटी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांनी माघार घेण्यापूर्वी राळेभात पिता-पुत्र, भोसले, राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय वारे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यात या मतदारसंघात आ. रोहित पवार यांनी बैठक घेवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा बँक ही शेतकर्यांची संस्था आहे.या ठिकाणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ज्येष्ठ नेते जगन्नाथ राळेभात यांना विजयी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राळेभात हे तालुक्यातील सहकारीत बडे नेते आहेत. त्यांनी तालुक्यात कधीच पक्षीय राजकारण केले नाही. तसेच तालुक्यात रोहित पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे, असे वारे म्हणाले.
माघार घेतलेले भोसले यांनी आ. पवार यांच्या आदेशानूसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगीतले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा धागा पकडून बँक बिनविरोध करण्यासाठी माघार घेत आहे, असे ते म्हणाले. तर राळेभात यांच्यावतीने त्यांचे मोठे चिरंजीव सुधीर राळेभात यांनी पत्रपरिषदेत भूमिका मांडली.
आमच्यासाठी विखे हाच पक्ष असून बँकेच्या राजकारणात त्यांच्या सोबत राहणार आहे.मात्र, जामखेड तालुक्यात आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याची भूमिका आहे, असे त्यांनी सांगीतले.
तसेच आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करून माघारीची ही प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सर्वजणांनी एकत्रितपणे राष्ट्रवादीचे भोसले यांचा उमदेवारी अर्ज मागे घेतला.
पाचव्यांदा संचालक होण्याचा मान !
राळेभात हे 1997पासून एक अपवाद वगळता तेवीस वर्षांपासून संचालक आहेत. यावेळी पाचव्यांदा संचालक होण्याचा मान राळेभात यांना मिळाला. राळेभात यांच्या सहकाराच्या राजकारणाची सुरुवात 1997साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध संचालक होऊन झाली होती. चार वेळा त्यांनी निवडणूक लढविली. एक वेळेचा अपवाद वघळता ते तीन वेळा विजयी झाले होते. दोन वेळा बिनविरोध असे मिळून पाचव्यांदा संचालक झाले आहेत.