महाराष्ट्र

Pension Scheme : पेन्शन वाढ न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान

Published by
Ahmednagarlive24 Office

Pension Scheme : दहा ते बारा वर्षांपासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत नसल्याने व महागाईच्या काळात जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न बनला असताना शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या मेळाव्यात ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी डिसेंबर अखेर पेन्शन वाढ न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव घेण्यात आला.

नगरच्या मार्कंडेय संकुल येथे रविवारी (दि. २४) जिल्ह्यातील ईपीएस ९५ पेन्शनर्सच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष एस. एल. दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्मचारी १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे,

उपाध्यक्ष पुंडलिकराव पांडे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, अॅड. गोकुळ बिडवे, गोपीनाथ घायतोंडे, शिवपुती निळकंठ, सुरेखा दोडके, चांगदेव बडे, आबा सोनवणे, भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा आदींसह जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व पेन्शनर्सनी या मेळाव्यात एकजुटीचा नारा देऊन हक्काची पेन्शन वाढ मिळण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या. या मेळाव्यात सरकारला जाग आणण्यासाठी डिसेंबरमध्ये दिल्ली येथे जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर डिसेंबर २०२३ पर्यंत पेन्शन वाढ न झाल्यास भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव श्री. दहिफळे यांनी मांडला. त्याला सर्वांच्या वतीने टोकेकर यांनी अनुमोदन दिले. जो पक्ष आपल्या अजेंड्यात व जाहीरनाम्यात पेन्शन वाढचा मुद्दा घेईल त्यांना पेन्शनर्सचे मतदान राहणार असल्याचे स्पष्ट करुन किमान ९ हजार रुपये पेन्शन वाढ करण्याची मागणी करण्यात आली

Ahmednagarlive24 Office