माजी आमदार औटींच्या दुर्लक्षामुळे पाण्याचे संकट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीची १५ वर्षे सत्ता असतानाही मुलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने तलावात पाणी असूनही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड दयावे लागत असल्याची घणाघाती टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक चंद्रकांत चेडे यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे नाव न घेता केली.

गेल्या काही दिवसांपासून पारनेर शहरास विलंबाने पाणीपुरवठा होत असून त्या पार्श्‍वभूमिवर उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, चंद्रकांत चेडे, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, विशाल शिंदे, अर्जुन भालेकर, रायभान औटी यांनी हंगा तलावास भेट देउन पाहणी केली.

त्यावेळी बोलताना चंद्रकांत चेडे यांनी माजी. आ. विजय औटी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.ते म्हणाले, शहराची लोकसंख्या, पंधरा वर्षात निर्माण झालेले गृहनिर्माण प्रकल्प, बाहेरगावावरून येणारे लोक याचा विचार करून पूर्वीच्या नेतृत्वाने विविध सुविधा निर्माण करून देणे गरजेचे होते.

१५ वर्षांपासून ग्रामपंचायत तसेच नगरपंचायतीची सत्ता त्यांच्याच ताब्यात असल्याने या गोष्टींची त्यांना कल्पना होती. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शहरातील मुलभूत सुविधांची ही अवस्था झाली आहे. अनेक लोकांनी स्थलांतर केले, अनेकजण फ्लॅट सोडून गेले, त्यास हेच नेतृत्व जबाबदार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24