Godavari River : नांदूर मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात १६ हजार ३५५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण ७० टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.
पाऊस रुसल्याने गोदावरीत पाण्याची प्रतीक्षा होती; मात्र इगतपुरी तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक धरणात होत आहे. प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
हे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात येत असल्याने पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे येथून विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आला आहे. येथून १६३५५ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी जायकवाडीकडे झेपावण्यास सुरुवात झाली आहे.
नांदूरमधमेश्वर बंधायातून मंगळवारी (ता. २५) सकाळी ३,००० दुपारी ५.५७६ तर सायंकाळी ७.१९० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. तो आता कमी करून बुधवारी (ता. २६) ५.५७६ इतका करण्यात आला आहे. यापूर्वी १२५० क्युसेक विसर्ग सुरू होता. (२८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता ४४६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवून रात्री १० वाजता १६,३५५ क्यूसेक केल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
गेल्या २४ तासात पडलेला पाऊस कंसात एकूण पडलेला पाऊस मीमी मध्ये दारणा ४० (४७३), मुकणे ६० (५१९) वाकी ७० (८८.४), नाम ६० (११३३), भावली १५६ (२१४५) वालदेवी ४७ (२४०), गंगापुर ५० (५५०), काश्यपी ४५ (४५३), गौतमी ८० (६४३), नांदुरमध्यमेश्वर ४ (८३), नाशिक १६ (२५५), इगतपुरी १३६ (१८८८), त्र्यंबकेश्वर १०० (८०१), देवगाव ७ (१६७) ब्राम्हणगाव ० ( १५७), कोपरगाव ० (१२३), पडेगाव ० (७४), सोमठाणे ० (६९), कोळगांव ५ (१४३) सोनेवाडी ५ (१३८), शिडी ७ (९७), राहाता ७ (१४५), रांजणगाव खुर्द १३ (१३६), चितळी २४ (९०) असा आहे. गोदावरी नदीत १६३५५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.