औरंगाबाद : राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची २५ व २६ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हजारो परीक्षार्थींना यामुळे दिलासा मिळाला असून आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती.
त्यामुळे दोन्ही ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कुठली तरी एकच परीक्षा देता येणार असल्याने जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपाल, राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे केली होती.
अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने शुक्रवारी पत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेस बसणे शक्य व्हावे यासाठी जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे म्हटले आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आ.सतीश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.