आरक्षण तर मिळालं, पण आम्ही 100 टक्के खुश नाही- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून आमचा ओबीसींसाठी लढा सुरू आहे. अनेक वर्षांच्या लढाईनंतर आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आरक्षण तर मिळालं, बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं पुढचं काम असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ओबीसी आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरु होता. आज या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आले आहे. आम्ही शिवसेना सोडल्यापासून ओबीसी आरक्षणाच्या मागे लागलो. अनेक ठिकाणी भेटी दिल्या, कोर्टात गेलो. आंदोलने, निदर्शने केली. शेवटी महाविकास आघाडी सरकार आलं. महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचे काम पूर्ण केले. आणि शिंदे, फडणवीस सरकारने ने पुढे नेले. त्यानंतर ओबीसी आरक्षण मिळाले. छगन भुजबळ पुढे म्हणाले, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आम्ही 100 टक्के खुश नाही. ज्या ठिकाणी कमी डाटा दाखवलाय, तिथे राज्यसरकारने त्याची शहानिशा करावी. तसेच ओबीसींचे आरक्षण वाढवा, आकडा बदला ही राज्यसरकारकडे मागणी करणार असून ओबीसींना देशव्यापी 27 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

ओबीसी आरक्षणासंदर्भात यापुढेही आमचं काम सुरूच राहणार असून येत्या जनगणनेत ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरणार आहोत. यापुढे बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं काम असेल, कारण  सिन्नरमध्ये सरपंच, उपसरपंच ओबीसी असतानाही तिथे शून्य ओबीसी दाखवले, याबद्दल चौकशी करणार आहोत.  ओबीसी समाजाला मिळालेल्या ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वांचे असून महाविकास आघाडी, भाजप आणि अन्य पक्षांचेही, जे जे रस्त्यावर उतरले त्या सर्वांचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.