Maharashtra News : खासदार सुप्रिया सुळे यांचे तिकीट आमच्या पक्षाकडून आधीच जाहीर झाले आहे. त्या यापूर्वी तीन वेळा खासदार आहेत. विरोधकांचे तिकीट आता जाहीर झाले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला म्हणजे शरद पवार यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा मनसुबा जाहीर केला. भाजपकडून विविध नेत्यांवर अनेक आरोप केले जात होते. त्याचे पुढे काय झाले, हे सांगावे, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी केला.
आमदार पवार म्हणाले की, पैशांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर केला जात असेल, तर सामान्य लोक कसे निवडणूक लढणार? ब्रिटिशांकडे पैसे होते, म्हणून त्यांच्यासोबत भारतीय गेले नाहीत. ब्रिटिशांचा मुद्दा येत नसला, तरी त्यांनी जी वृत्ती वापरली तीच आता भाजपकडून वापरली जात आहे.
भाजपने पवार कुटुंब फोडून अजित पवार यांच्या खांद्यावरून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आले. पुणे जिल्ह्यात जी प्रगती आणि विकास झाला, शेतकरी अडचणीत असताना बेरोजगारांना रोजगार देण्यात आले, त्यात शरद पवार यांची भूमिका मोठी आहे.
नेत्यांचा विकास होण्यापेक्षा सामान्य लोकांचा विकास होणे आणि प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. सुनील तटकरे हे मला बालिश म्हणतात, पण ते सिंचन चिखलात अडकलेले नेते असून, एका घराच्या पत्त्यावर १०० कंपन्या रजिस्टर आहेत.
माझ्यावर दबाव असला तरी मी भाजपसोबत जाणार नाही. सुनील तटकरे यांच्याइतकी बुद्धी आणि पक्ष सोडण्याची वृत्ती माझ्याकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले
आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत यावे !
वंचित पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते असून, त्यांनी मागील वेळी निवडणुकीत स्वपक्षाचे उमेदवार उभे केले. त्याचा तोटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला आणि भाजपला फायदा झाला आहे.
त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत चर्चा करून संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना फायदा होईल, असे कृत्य करू नये. संविधान टिकवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पवार म्हणाले.