मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्याच देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक भारतीय परदेशांमध्ये अडकले आहेत.
त्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी व त्यांच्या कोरोना टेस्ट पासून सर्व सुविधा उपल्भ करून देण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ राबविण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटात भारतातील सुमारे 2 लाख लोकं परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे काम सरकारने सुरु केलं आहे. 7 ते 13 मे या कालावधीत एअर इंडियाच्या विमानांच्या 64 फेऱ्या होणार आहेत.
त्यात 14 हजार 800 भारतीयांना परत आणले जाणार आहे. एअर इंडियाची 64 विमान आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस 12 देशांमधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे.
या देशांमध्ये युएई, यूके, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, कुवैत आणि ओमानचा समावेश आहे. युएईसाठी 10 उड्डाणे होतील. सुमारे दीड लाख भारतीय युएईमध्ये अडकले आहेत.
त्याशिवाय अमेरिकेला सात, युकेला सात, सौदी अरेबियाला पाच, सिंगापूरला पाच आणि कतारला दोन विमानं उड्डाण करतील. आज रविवारी पहाटे पहिलं विमान मुंबईत पोहोचलं.
325 प्रवाशांना घेऊन हे स्पेशल विमान लंडनमधील हिथ्रो एअरपोर्टहून निघालं होतं. लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आले.
सर्व प्रवासांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.