अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- तब्बल साडे तीन कोटी रुपये निधी वापरून मनपाने आणलेले एम आर आय मशीन चक्क भाजी मार्केट च्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे.
कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर आयुक्तांचे करायचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला आहे. अहमदनगर महानगर पालिकेने नगरकरांना अल्प दरात महागडी एम आर आय ची सुविधा मिळावी यासाठी हे मशीन खरेदी केले .
त्यासाठी साडे तीन कोटी रुपयांचा नियोजन मंडळांचा निधी वापरण्यात आला. सहा महिन्यापूर्वी महासभेची मंजुरी यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळी महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. त्यांच्याच सहीने हा एम आर आय खरेदी प्रस्ताव देण्यात आला होता .
नगरकराना एक चांगली आरोग्य सेवा कमी पैशात मिळेल अशी सर्व सामान्यांची अपेक्षा होती . पण आता सहा महिने उलटूनही हे मशीन जागे अभावी कोठेच बसविण्यात आलेले नाही . अगदी काल परवाच या मशीनचे साडेतीन कोटी रुपयांचे बिल संबंधित पुरवठादार कंपनीला अदा करण्यात आले आहे .
त्यानंतर हे मशीन कोठे बसवण्यात आले आहे अशी विचारणा पालिकेत गिरीश जाधव व सेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे , काका शेळके यांनी केली. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर शिवसैनिकांनी या मशीनचा शोध घेतला असता त्यांना धक्काच बसला .
कोरोनाच्या काळात नगर मध्ये वेळेत योग्य आरोग्य सुविधा मिळत नाही . केवळ उपचारच न मिळाल्याने नगरमधील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. अशा स्थितीत हे एम आर आय मशीन अशा प्रकारे धूळ खात पडून असल्याचे आढळले . हे एम आर आय सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केच्या आवारात अक्षरशः धूळखात पडून आहे.
पावसाच्या पाण्याने हे यंत्र खराब होऊ नये म्हणून केवळ एक प्लॅस्टिक ताडपत्री यावर टाकण्यात आली आहे. बेवारस अवस्थेत हे मशीन शिवसैनिकांना सापडले . याबाबत संताप व्यक्त होत आहे. वास्तविक हे एम आर आय कोठे बसवायचे हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत हे मशीन पालिकेला खरेदीच करता येत नाही.
या मशीन मध्ये अतिउच्च क्षमतेचे मॅग्नेट असते. त्यामुळे हे मशीन आणण्यासाठी मुंबईच्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राची रीतसर परवानगी घ्यावी लागते . असे असताना पालिका अधिकारी आणि पालिका पदाधिकाऱ्यांनी केवळ टक्केवारीसाठी हा मशीन खरेदीचा खटाटोप केला आहे.
नगरकरांनो आता तरी जागे व्हा असे आवाहन गिरीश जाधव यांनी केले आहे. पालिकेचे एम आर आय एखाद्या डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकावा असे ठेवण्यात आले आहे. परिसरातील घुशींनी लाकडी पॅकिंग पोखरले आहे. मशीनच्या वायरी कुरतडल्या आहेत. सहा महिने अशीच स्थिती असल्याने यातील उच्च दर्जाच्या मॅग्नेटची क्षमता संपली असावी.
हे मशीन चालू होण्याच्या स्थितीत नसल्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मातीमोल झाली आहे. नगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात एकमेव सरकारी एम आर आय सेंटर आहे. जर पालिकेचे एम आर आय स्वस्त दरात सुरु झाले असते तर खाजगी व्यावसायिकांचा धंदा बंद झाला असता .
म्हणून की काय पालिकेच्या आरोग्य खात्याने हे मशीन बसविण्याची तसदी घेतली नसावी . सध्या आरोग्य सेवेचा प्रचंड बोजवारा उडालेला आहे. कोरोनाच्या नावाखाली खाजगी कोविड सेंटर मध्ये लुटातूट सुरु आहे. सामान्य नगरकर जीव मुठीत धरून वावरत आहे.
तरी देखील पालिकेला हे मशीन सुरु करण्याचे सुचत नाही यातून पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कशी मिलीभगत आहे हेच यातून दिसत असल्याचा आरोप गिरीश जाधव यांनी केला आहे.
सावित्री बाई फुले भाजी मार्केटच्या मोकळ्या जागेत उघड्यावर ठेवण्यात आलेल्या या मशीनची पाहणी करण्यासाठी गिरीश जाधव व बाळासाहेब बोराटे यांच्या समवेत , मंदार मुळे , परेश लोखंडे , विशाल वालकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved.