अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील सभा एक मे रोजी औरंगाबादमध्ये घेण्याची घोषणा केली आहे. मुस्लिम बाहूल वस्ती आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे लक्ष लागले आहे.
ही सभा घेण्यास परवानगी मिळणार का? सभेत भोंग्यांसोबत ठाकरे आणखी काय काय नवे मुद्दे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
ठाण्यातील उत्तरसभेत त्यांनी समान नागरी कायद्याचा विषय मांडला, तसा औरंगाबादमध्ये नामांतराचा मुद्दा छेडला जाण्याची शक्यता आहे. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली. मुख्य म्हणजे ठाण्यात त्यांच्या सभेला सुरवातीला अडचण आली होती.
त्यामुळे त्यांनी औरंगाबादमध्ये शनिवारीच मैदानाचे बुकिंग करून ठेवले आहे. मनसेकडून हे मैदान २९ एप्रिल ते २ मे या चार दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे.
घोषणेनंतर इतर कोणीही हे मैदान बुक करू नये, यासाठी ही दक्षता घेतल्याचे दिसते. तेथे शिवसेनेची सत्ता आहे. शिवाय सभेसाठी पोलिसांकडून परवानगी देताना अडचणी येऊ शकतात.
यावर मात करून सभा झाली तर तेथे आता ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय आणि समान नागरी कायद्याचा विषय ते घेतीलही.
मात्र, औरंगाबाद आणि अहमदनगरमध्ये नामांतराचा जुना मुद्दा आहे. त्यावरून अलीकडे भाजपने शिवसेनेची कोंडी केलेली आहे. नगरविकास विभाग शिवसेनेकडेच आहे.
त्यामुळे ठाकरे औरंगाबादच्या सभेत पुन्हा एकदा हा मुद्दा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे मुस्लिम बाहूल शहर आणि शिवसेनेची सत्ता, तसेच शिवसेनेचे आमदार जास्त असलेला जिल्हा असल्याने या सभेला राजकीय दृष्याही वेगळे महत्व आहे.