Maharashtra News : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणारा होमगार्ड अजूनही उपेक्षित जिणे जगत आहे. अनेक वेळा मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे होमगार्डना कधी वर्षाचे ३६५ दिवस काम मिळेल? याची प्रतिक्षा आहे.
राज्यात ५० हजारांच्या वर होमगार्ड आहेत. जिल्ह्यातही त्यांची संख्या मोठी आहे. होमगार्ड पोलिसांना मदतीचे काम करीत असतात; परंतु शासनाकडून कायम त्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जातो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सुरक्षेचे काम करीत असताना पोलिसांच्या तुलनेत अगदीच अत्यल्प मानधन त्यांना दिले जाते.
याबाबतीत अनेक वेळा होमगार्ड संघटनांकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. होमगार्डना कायम करण्यापासून मानधनात वाढीपर्यंत अनेक मागण्यात अनेक वेळा करण्यात आल्या. शासनानेही त्यांना आश्वासन दिले; परंतु ते कधीच पूर्ण केले नाही.
होमगार्ड हे पद अस्थाई आहे. त्यांना गरज पडेल, तसे कामावर बोलावले जाते. परंतु त्यांना नियमित काम दिले जात नाही. परिणामी घरखर्च भागेल इतकेही त्यांना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण बनत चालले आहे. त्यामुळे त्यांना जास्त मानधन देऊन नियमित काम देण्याची गरज आहे.
आंदोलने करून पदरात काहीच नाही
होमगार्ड संघटनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. गणेशोत्सव, निवडणूक व इतर ठिकाणच्या बंदोबस्तावर वेळोवेळी बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी विधानसभेत होमगार्डच्या कामाच्या दिवसांमध्ये वाढ करून वेतनातही वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु ते काही अजून पूर्ण झालेले नाही. जे मानधन दिले जाते तेही वेळेवर मिळत नाही.